जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उडणारा राजकीय धुराळा (मातीच्या धुळीची जळगावकरांना सवय झाली आहे.) हा नवा विषय राहिलेला नाही. खड्ड्यांवरुन सोशल मीडियावर अनेक मिम्स् व्हायरल होत असल्याने जळगावच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची महती राज्यभर पसरली आहे. आता तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule Viral Facebook Post) यांनी एक फेसबुक पोस्ट केल्यामुळे जळगावच्या रस्त्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. महापालिकेत शिवसेनेच्या महापौर आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्रीही शिवसेनेचे आहेत एवढेच काय तर राज्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचे असतांना राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याकडून जळगावकरांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेल्या रस्त्यांवरुन स्थानिकांना शालजोडीतील जोडे लगावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अगदी रस्त्यांवरील खड्यांच्या विषय पेटवून (या रस्त्यांची तुम्हाला चीड येत नाही का?) भाजपाने महापालिकेत सत्ता मिळविली होती. मात्र त्यानंतर बर्याच राजकीय घडामोडी घडल्या. आता महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादीची ताकद देखील आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राज्यातही सत्तेत असल्याने महापालिकेला निधी मिळण्यात काहीच अडचण येत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी पारड्यात पाडून घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम देखील सुरु झाले आहे. मात्र शहरातील रस्ते अद्यापही खड्डेमुक्त झालेले नाहीत. आता रस्त्यांवरुन गाडी चालविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होईल? असा प्रश्न जळगावकरांना सतावत आहे.
शहरातील रस्त्यांची वाट लागलेली कमी होती कि काय जळगावातील महामार्ग देखील ढंगाचे केलेले नाही. महामार्गातील दोष अनेकवेळा काही दिग्गजांनी निदर्शनास आणले आहेत. जिल्ह्यात रस्त्याच्या साईट पट्ट्या आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. मंगळवारी खा.सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्यात येऊन गेल्या. जळगाव दौरा आटोपल्यावर अपघातांच्या मुद्याला धरुन खा.सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ‘जळगाव दौर्यावर असतांना या संपूर्ण प्रवासात वाहनचालक सुभाष काळुंखे, किरण यादवराव कोरडे यांनी अतिशय काळजीपूर्वक गाडी चालविली. याबद्दल त्यांचे मनापासून आभार.’ असे त्यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी दोन्ही वाहन चालकांसोबत स्वत:चा फोटो देखील पोस्ट केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच जळगाव दौर्यावर आल्या होत्या. जळगावातील आंदोलन, खा.रक्षा खडसे यांनी त्यांची घेतलेली भेट याची सध्या चांगलीच चर्चा आहे. मात्र खा.सुळे यांच्या या पोस्टने आणखी लक्ष वेधले गेले आहे. मात्र यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्या राज्यभर दौरा करत असतात. मात्र अशा प्रकारे वाहन चालकांचे कौतूक करणारी पोस्ट त्यांनी कधी केलेली नाही. यामुळे जळगाव दौर्याच्या त्यांच्या या पोस्टची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शालजोडीतले टोले लगावले आहे का? कि मनपाची पार इज्जत काढली आहे? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र जेव्हा सुप्रिया सुळेंसारख्या बड्या नेत्या एखादी भुमिका मांडतात तर त्याची चर्चा तर होणारच.. जिल्ह्यातील दिग्गज लोकप्रतिनिधींनी हीच पोस्ट समोर ठेवत राज्यशासनाकडून किंबहुना खा.सुप्रिया सुळेंचा वशिला वापरून जळगावकरांना चांगले रस्ते देण्यासाठी भरगोस निधी पदरात पाडून घेण्यात स्वारस्य मानावे.