एक तर आयुक्तांनी आयुक्तपद सोडावं किंवा आम्ही महापौरपद सोडतो – सुनील महाजन
जळगाव लाईव्ह न्युज | २८ सप्टेंबर २०२१ | चिन्मय जगताप | मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे जळगाव शहराचा विकास होत नाहीये. मिळालेल्या निधीचे साधे कार्यादेश ही आयुक्त काढू शकत नाहीयेत. यामुळे एकतर आयुक्तांनी आयुक्तपद सोडावं किंवा आम्ही महापौर पदाचा राजीनामा देतो. अशा शब्दात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जळगाव लाईव्ह च्या माध्यमातून आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला.
अशा आयुक्तांसोबत काम करणं अतिशय कठीण असून आयुक्तांना कार्यमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या महासभेत विशेष ठराव केला जाणार आहे. आयुक्तांचा महानगरपालिकेवर कोणताही अंकुश नाही. त्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे जळगाव शहराचा विकास रखडला आहे. मनपाला निधी मिळून सुद्धा आयुक्त कार्याधेश काढायला तयार नाहीत. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्यावर नाराज असून त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय अविश्वास ठराव येत्या महासभेत करण्यात येणार आहे.
सर्वच पक्ष त्यांच्यावर नाराज
जळगाव महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर नाराज असून आयुक्तांमुळे नगरसेवक कोणतेही काम ते करू शकत नाहीयेत. याबाबतची बैठक नुकतीच घेण्यात आली होती व हा सर्वपक्षीय निर्णय आहे.
महानगरपालिका म्हणजे वृद्धाश्रम नाही
जळगाव महानगरपालिका म्हणजे काही वृद्धाश्रम नाहिये. जिथे रिटायरमेंटच्या आधी लोक येऊन बसतील. आयुक्तांच्या या कारभारामुळे शहरातील रस्त्यांचा असो वा डेंग्यूचा प्रश्न असो कोणताही प्रश्न मार्गी लागत नाहीये.
आयुक्तांनामुळे होत नाहीयेत ही काम
महानगरपालिकेतील आस्थापना विभागातील कामे, रस्त्याची कामे, डेंग्यू समस्या व इतर अशी कित्येक कामे केवळ आयुक्तांच्या अकार्यक्षम कारभारामुळे होत नाहीयेत.