जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून अशातच जळगावतील आणखी एक शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. सततची नापिकी व वाढत जाणारा कर्जाचा बोझा यातून आलेल्या नैराश्याला कंटाळून कंडारी येथील तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली. राहत्या घरात कीटकनाशक सेवन केल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
समाधान एकनाथ धनगर (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. माधान धनगर हे शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मागील काही हंगामात शेतात सततची नापिकी येत होती. यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेड करू शकत नसल्याने त्यातून वाढत जाणाऱ्या कर्जामुळे समाधान धनगर मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. कर्जाच्या तणावात असताना त्यांनी रविवारी रात्री आठला त्यांनी कीटकनाशक सेवन केले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली.
सदरची बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री नऊला त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या मागे आई कमलबाई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.