बाप रे..! गोदामाला अचानक आग, मंडप साहित्य खाक, घटनास्थळी आमदारांची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील गोदामाला बुधवारी रात्री आग लागली. त्यात लाखो रूपयांचे मंडप साहित्य जळून खाक झाले. आमदार शिरीष चौधरी व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
अधिक माहिती अशी की, अहिरवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गोदामात पाडले येथील बाळकृष्ण महाजन यांचे मंडप व्यवसायाचे साहित्य ठेवले होते. बुधवारी रात्री एक वाजता अचानक या गोदामातील साहित्याला आग लागली. हा प्रकार लक्षात येताच सोसायटीचे चेअरमन नागेश्वर चौधरी, संदीप सावळे, बाळू महाजन, विशाल चौधरी बंडू पाटील, सुशांत चौधरी मनोज महाजन यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे रावेर व सावदा येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशामक जवानांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन तासानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, गुरुवारी आमदार शिरीष चौधरी यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या. नुकसानीचा पंचनामा करण्याचा आदेश देवगुणे यांनी दिले आहेत. याप्रकरणी रावेर पोलिसांतत नोंद करण्यात आली. आगीचे कारण मात्र समोर आले नाही.