जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील गायरान येथे चार कुपोषित बालके आढळली होती. त्यांच्यावर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील एनआरसी कक्षात १४ दिवस यशस्वी उपचार करण्यात आले. आता त्यांच्यावर आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे.
तालुक्यात ग्रामीण भागात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीत गायरान (ता.यावल) या आदिवासी पाड्यावर चार कुपोषित बालके आढळली होती. या चौघांची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कुपोषित बालकांचे पुनर्वसन केंद्र एनआरसी वॉर्डात हलवले होते. येथे १४ दिवस उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आता स्थानिक आरोग्य पथकातील डॉ. वैशाली निकुंभ, आरोग्य सेविका उषा बाऱ्हे, उमेश येवले, अविनाश बारी, आरिफ तडवी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. हा प्रकार पाहता तालुक्यात पुन्हा कुपोषणाने डोके वर काढल्याचे चित्र आहे.
कुपोषित बालकांसोबत त्यांच्या आईला देखील रुग्णालयाच्या विशेष कुपोषित बालक वॉर्डात १४ दिवस उपचार दिले जातात. नाश्ता, दोन वेळ सकस आहार व बालकांच्या मातेला बुडीत मजुरी म्हणुन ३०० रूपये शासनाकडून दिले जातात.