जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । बारावी बोर्ड परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. काल बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १ गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा १ गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
काल बारावी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १ गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. याबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जात आहे.
या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्र असतील. आजचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असणार आहे. यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिट तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. कालपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.