जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा आश्रम शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्यात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. पालकांनीही घाईघाईने शाळेकडे धाव घेतली आणि आपल्या मुलांना घेऊन गावाकडे रवाना झाले. यामागील कारण म्हणजे आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीला भूत दिसल्याची अफवा पसरल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी शाळा सोडली.

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहे. येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र या शाळेत भूत असल्याची चर्चा सुरु आहे. घटनेची सुरुवात एका विद्यार्थिनीला अचानक काहीतरी भयानक दृश्य दिसल्यामुळे झाली. तिने जोरजोरात किंचाळत घाबरणं सुरू केलं. काही क्षणातच तिला भोवळही आली. तिच्या प्रतिक्रियेने अन्य विद्यार्थीही घाबरले आणि भूत असल्याची चर्चा शाळेभर पसरली. कोणताही तर्कशुद्ध विचार न करता अनेक विद्यार्थी घाबरले, रडू लागले आणि ही अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. शाळेतील वातावरणच एकदम भयभीत आणि अनिश्चित झालं

ही घटना समजताच काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी फोन करून घडलेली गोष्ट पालकांना सांगितली. यानंतर पालकांनी रात्रीच शाळेकडे धाव घेतली. एकाच वेळी शेकडो पालक शाळेवर पोहोचले आणि आपल्या मुलांना तात्काळ घेऊन गावी निघून गेले. विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला, पण घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी ऐकून न घेता शाळा रिकामी केली.

मात्र या निमत्ताने आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधांचा अभाव देखील चव्हाट्यावर आला आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपयांचे वार्षिक अनुदान घेऊन मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र या आश्रम शाळांमध्ये दिसून येत आहे. त्याकडे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोयीस्कर कानाडोळा केल्याचे चित्र आहे.









