एसटीचा संप : सावदा स्टॅण्डमध्ये आढळले चिमुकले भाऊ-बहीण
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुकशुकाट असलेल्या सावदा येथील बस स्थानकात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दाेन चिमुरडे बहीण-भाऊ बेवारस स्थितीत व भुकेलेल्या अवस्थेत आढळले असता. त्या दाेघांना पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
त्या दाेघांपैकी मुलगी अंदाजे साडेपाच वर्षांची असून तिच्या चेहऱ्यावर व हातावर देवीचे पुरळ आहेत. तर मुलगा साडेतीन वर्षांचा असून ते मराठी भाषिक आहेत. ते उपाशी असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांना केळी, बिस्किटांचा खाऊ दिला. त्यामुळे त्यांना थाेडी हुशारी आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ते काहीच माहिती देऊ शकत नव्हते. मात्र, ते सतत रावेर या नावाचा उल्लेख करत असल्यामुळे त्या दोघांना त्यांचे आई-वडील मिळवून देण्यासाठी तपासासाठी सावदा पोलिस रावेरला घेऊन गेल्याची माहिती येथील पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी दिली. मुलांबद्दल कुणाला काही माहिती असल्यास येथील पाेलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.