एसटी वाचकाला मारहाण भोवली, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । एसटी प्रवासाचे निम्म्या भाड्याच्या तिकिटाचे कार्ड नसताना अर्धे तिकीट मागून वाहकास मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या एका प्रवाशास न्यायालयाने बुधवारी दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तुळशीराम हरलाल राठोड ( वय ६५, रा. विसापूर, ता. चाळीसगाव ) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, २१ सप्टेबर २०१८ रोजी राठोड हा चाळीसगा-मालेगाव बसमध्ये ( एमएच- १९, बीटी- १३४२ ) प्रवासासाठी बसला होता. या वेळी महेश देवचंद चव्हाण हे वाहक म्हणून ड्युटीवर होते. चव्हाण यांनी तिकिटासंदर्भात राठोडला विचारणा केली असता त्याने निम्मे तिकीट मागितले. परंतु, राठोडकडे निम्म्या तिकिटासाठी लागणारे विषेश कार्ड नव्हते. यामुळे पूर्ण तिकीट घ्यावे लागले. असे चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारली. तसेच शिवीगाळ केली. ‘तुझ्याकडून काय होते ते करून घे’ असे म्हणत धमकी दिली होती.
याप्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राठोडच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात दोषारोप सादर झाल्यानंतर शिक्षान्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात सरकार पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. सुनावणीअंती न्यायालयाने राठोड याला दोषी धरून शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अधी. रमाकांत सोनवणे यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले.