जळगावच्या सुपुत्राचा उपचारादरम्यान अंत; ‘एसआरपी’चे डीसीपी तुषार पाटलांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा

जून 8, 2026 1:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मुळचे राहणारे राज्य राखीव पोलीस दल एसआरपीएफ गट-5, दौंडचे समादेशक म्हणून कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुण्यातील ‘रुबी हॉल क्लिनिक’ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

tushar patil

त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या पार्थिवावर जामनेर येथील मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

तुषार पाटील हे मूळ जामनेर येथील रहिवाशी असून ते गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्येचा सामना करत होते. आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वतःची किडनी दान केली होती. मात्र, अलीकडे पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दरम्यान, काही काळापूर्वी एसआरपीएफ (SRPF) पेपरफुटी प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यामुळे ते चर्चेत आले होते.

तुषार पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत पोलीस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. अलीकडेच कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षक पदावरून त्यांची दौंड येथे समादेशक म्हणून बदली झाली होती. तुषार पाटील यांनी पोलीस अधीक्षक म्हणून कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई येथे वाहतूक विभागात सेवा केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे लोहमार्ग पोलीस दल येथे काम पाहिले होते.

एक कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी म्हणून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये केलेली सेवा नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now