खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची खरीपाची तयारी सुरू झाली आहे. पावसाच्या आगमनाची वाट पाहताना बियाण्यांची निवड, त्याची प्रक्रिया आणि योग्य साठवणूक याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माहितीकरिता जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामासाठी आवश्यक बाबी सांगणारी लेखमाला आजपासून सुरु करत आहोत.

या लेखमालेतील पहिला भाग सोयाबीन पिकासंबंधी…
सोयाबीन – महत्वाचे नगदी पीक
सोयाबीन हे महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाणारे एक प्रमुख व महत्वाचे नगदी पीक आहे. दरवर्षी याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत असून उत्पन्नात वाढ घडवण्यासाठी घरच्या उत्पादनातील बियाण्याचा वापर उपयुक्त ठरतो.
१. स्वपरागसिंचीत व सरळ वाणांचे वैशिष्ट्य
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्यामुळे त्याचे सर्व वाण सरळ (pure line) असतात. त्यामुळे दरवर्षी नव्याने बियाणे विकत घेण्याची गरज नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यास त्यातून मिळालेल्या उत्पन्नातील बियाणे पुढील दोन वर्षे वापरता येतात.
२. उत्पादन खर्चात बचत
स्वतःच्या उत्पादनातून निवडलेले बियाणे वापरल्यास नव्या बियाण्याची खरेदी टळते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात लक्षणीय बचत होते.
३. स्थानिक स्त्रोतांचा प्रभावी वापर
ग्रामबिजोत्पादन किंवा पीक प्रात्यक्षिकांतर्गत तयार बियाणे अथवा मागील वर्षीच्या उत्पादनातील निवडक बियाण्याचा वापर करता येतो.
४. योग्य बियाण्याची निवड
प्रमाणित बियाण्यांपासून तयार उत्पन्नात काटेकोरपणे निवड करावी. खडबडीत, डाग पडलेले, अर्धवट किंवा कीडग्रस्त दाणे बाजूला काढून फक्त एकसंध आणि चांगले दाणे वापरावेत.
५. बियाणे हाताळणीतील दक्षता
सोयाबीनचे बियाणे नाजूक असून त्याचे आवरण पातळ असते. त्यामुळे जोरदार आदळआपट टाळावी. अशा हालचालीमुळे उगवणक्षमता कमी होऊ शकते.
६. योग्य साठवणूक तंत्र
बियाण्यातील आर्द्रता १०-१२ टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. साठवणूक सुताच्या पोत्यांमध्ये करावी. बियाण्याची थप्पी ७ फूटांपेक्षा जास्त उंच असू नये.
७. उगवणक्षमता राखण्याची काळजी
बियाणे सावलीत वाळवावे. उगवणक्षमतेत घट होणार नाही यासाठी त्याचे हलके हाताळणी करणे आवश्यक आहे.
८. सुधारित पेरणी पद्धती
टोकन पद्धत किंवा प्लॅटरचा वापर करून बियाण्याचा प्रति हेक्टर दर ७५ किलोवरून ५०–५५ किलोपर्यंत खाली आणता येतो.
९. उगवणक्षमता लक्षात घेणे
जर बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर पेरणीसाठी अधिक बियाणे वापरणे गरजेचे आहे.
१०. पेरणीची योग्य वेळ
७५–१०० मिमी पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणी ३–४ सेमी खोलीवर व्हावी.
११. बुरशीजन्य रोगांचे प्रतिबंध
प्रत्येक किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. यामुळे मुळे कुजणे, डांब वगैरे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
१२. जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया
पेरणीपूर्व ३ तास अगोदर रायझोबियम व पीएसबी या संवर्धकांची प्रत्येकी २००–२५० ग्रॅम प्रमाणात बीजप्रक्रिया करावी आणि बियाणे सावलीत वाळवावे.
शेतकऱ्यांनो, खरीप 2025 मध्ये आपल्या स्वतःच्या निवडक बियाण्याचा वापर करा, खर्चात बचत करा आणि उत्पन्नात वाढ साधा!
अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
(संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव)