शेतकऱ्यांनो.. ‘इतका’ मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा, वाचा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२४ । गतवर्षीपेक्षा यंदा मान्सून वेळेपूर्वी महाराष्ट्रात दाखल झाला असून अनेक ठिकाणी मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या. तर काही ठिकाणी अद्याप मान्सून पोहोचला नाहीय. जळगावातही मान्सून पोहोचला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिप हंगामातील पेरणीला लवकर वेग येण्याची शक्यता आहे.
मात्र अशातच कृषी अधिकाऱ्यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी शंभर मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला दिला आहे. साधारणपणे एक जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन व सरासरी १०६ मिमी पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाच्या वेधशाळेने वर्तविले होते. त्यानुसार मॉन्सूनचे आगमन झालेही. मृगाच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या सरी कोसळल्या.
मात्र, हा पाऊस मॉन्सूनचा की वाळवीचा, याबाबत अजूनही अनेकांत साशंकता आहे. सहा जूनच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढग दाटून येत आहेत. तूरळक पाऊसदेखील होत आहे. वातावरणातील आर्द्रतेचा टक्कासुद्धा वाढत आहे. त्यामुळे जोरदार पावसाचे संकेत दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस जरी चांगला होत असला तरी एवढ्या पावसाच्या भरवशावर खरीप पेरणी करणे चुकीचे ठरेल.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पेरणीयोग्य पावसाची वाट पाहावी. त्यातही सरासरी १०० मिमी पाऊस होईपर्यंत किंवा जमिनीमध्ये दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी करण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा सल्ला भुसावळ तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.