⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

वीजबिल वसुलीच्या कामाला गती द्या – सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे

जळगाव लाईव्ह न्युज | ६ मे २०२२ | कोकण प्रादेशिक विभागाच्या वीजबिल वसुलीत मार्चनंतर पुन्हा शिथिलता आली आहे. परिणामी एप्रिल महिन्याचे चालू वीजबिलही पूर्णपणे वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे महिन्याच्या एक तारखेपासूनच चालू वीजबिल आणि थकबाकी वसुलीच्या कामाला गती देऊन महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.


    कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत भांडूप परिमंडल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (६ मे) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. डांगे म्हणाले की, विभागात सुमारे २७०० कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. चालू वीजबिलासह ही थकबाकी वसूल करण्यासाठी जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांच्या जोडण्यांची चालू वीजबिले दरमहा भरून घ्यावीत. अन्यथा त्यांचा वीजपुरवठा खंडित करावा. वीजबिलाचा परतावा वेळेत मिळाला तरच वीज खरेदीसारख्या महत्वाच्या कामासाठी पैसे उपलब्ध होऊ शकतील.


    कोकण प्रादेशिक विभागात न्यायप्रविष्ट प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना डांगे यांनी दिल्या. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना नवसंजीवनी ठरू शकणाऱ्या स्वर्गीय विलासराव देशमुख अभय योजनेतून सवलत द्यावी व सन्मानाने वीजवापर करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे. मीटर रीडिंग एजन्सीकडून आलेल्या रीडिंगच्या फोटोंची शंभर टक्के पडताळणी करावी व यात अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. कर्मचाऱ्यांशी संबंधित शिस्तभंग, चौकशी, निवृत्तीवेतन दावे, अनुकंपा तत्वावर वारसांना नोकरीत सामावून घेण्याची प्रकरणे मुदतीत सोडवावीत असे निर्देश त्यांनी दिले.


    या बैठकीला भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, कोकण (रत्नागिरी) परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते.