जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । आधारभूत खरेदी किंमत योजनेत ज्वारीला ३१८० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आदेश दिले आहे. मात्र, अद्याप एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. दुसरीकडे बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून २२०० रुपये प्रति क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात येत आहे.
हमीभावापेक्षा प्रति क्विंटलमागे ९८० रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आधारभूत खरेदी किंमत योजनेत शासकीय खरेदी केंद्रांवर ज्वारी विक्रीसाठी ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी सातबारा उताऱ्यावर पीक पेरा, आधार संलग्न बैंक खाते क्रमांक व इतर कागदपत्रे स्वीकारण्यात आली. नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत हमी भावाने ज्वारी विक्रीसाठी जिल्ह्यातील ४२४६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात आधारभूत खरेदी किंमत योजनेत १८ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश आहेत. अद्याप हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. तालुकास्तरावर तहसीलकडून शासकीय गोदाम उपलब्धतेनुसार ज्वारी खरेदी सुरू होतील, असे जिल्हा विपणन अधिकाऱ्यांनी सांगितले. गोदाम उपलब्ध होऊन शासकीय ज्वारी खरेदी केंद्र किती दिवसांमध्ये सुरू होतील हे सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ज्वारी खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे. हे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून केली जाते आहे.