जळगाव : अमळनेर तालुक्यातील लोण गावातील सीमा सुरक्षा दलामधील लीलाधर नाना पाटील (वय ४२ वर्षे) या जवानाचा अरुणाचल प्रदेशात अपघातात मृत्यू झाला. सैन्य दलाच्या ज्या गाडीतून लीलाधर पाटील हे इतर जवानांसोबत जात होते, त्या गाडीचे अचानक मागचे फाटक तुटल्याने लीलाधर पाटील हे खाली पडले. दगडाचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
लोण येथील रहिवाशी लीलाधर पाटील यांना देशसेवेची आवड असल्याने ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. ते सध्या ते आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी, भारतमातेच्या सेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ वाढवून घेतला होता. याचदरम्यान लीलाधर पाटील यांची आसाम राज्यातील गुवाहाटी येथून अरुणाचल प्रदेशात बदली झाली होती. अरुणाचल प्रदेश हे आसाम राज्यापासून ४०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मंगळवारी सैन्य दलाच्या ट्रकमधून लीलाधर पाटील यांच्यासह २० जवानांची एक तुकडी अरुणाचल प्रदेश सेवेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी मार्गस्थ झाली.
सीमा सुरक्षा दलाचो जवान ट्रकमधून पहाडी रस्त्याने अरुणाचल प्रदेश मध्ये जात होते. या वाहनात जवान लीलाधर पाटील हे मागच्या बाजूने बसले होते. याचदरम्यान प्रवासात एके ठिकाणी अचानक जवान जात असलेल्या ट्रकचे मागचे फाटक तुटले. यात काही कळण्याच्या आत मागे बसलेले लीलाधर पाटील हे ट्रकमधून बाहेर खाली पडले.
खाली पडल्यानंतर दगडांचा जोरदार मार लागल्याने लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन थांबवून वाहनातील जवान हे लीलाधर पाटील पडल्याच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत लीलाधर पाटील यांची प्राणज्योल मालवली होती.मयत लीलाधर पाटील यांच्या पश्चात आई मीराबाई, वडील नाना पौलत पाटील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे.