जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । देशांतर्गत महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधीच सर्वच गोष्टी महागल्याने सर्वसामान्यांचे कंबरडी मोडली गेली असता त्यात आता तर चक्क बाथरूम पर्यंत महागाईची झळ बसणार आहे. कारण आता अंघोळीचा साबण, आणि शाम्पूचे दर वाढणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील सर्वात मोठ्या FMCG (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) ब्रँड HUL (Hindustan Unilever Limited) ने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. लक्स साबणापासून ते क्लिनिक प्लस शाम्पू आणि पॉन्ड्स टॅल्कम पावडरपर्यंत सर्व काही महाग झाले आहे. अशाप्रकारे सतत महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका सहन करावा लागत आहे.
भाव किती वाढले ते जाणून घ्या..
शाम्पू श्रेणीमध्ये सनसिल्क शाम्पूच्या किमतीत 8 ते 10 रुपयांनी वाढ करण्यात आली असून क्लिनिक प्लस शॅम्पू 100 मिली बाटलीच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
साबण श्रेणीमध्ये, लक्स साबणाची किंमत 9 टक्क्यांनी वाढली आहे. सोबतच पियर्स साबणाच्या दरातही वाढ झाली आहे. 125 ग्रॅम पिअर्स साबणाच्या किमतीत 2.4 टक्के आणि मल्टीपॅक पिअर्सच्या किमतीत 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
स्किन केअर सेगमेंटमध्ये, ग्लो आणि लव्हली क्रीमच्या किमतीत 6-8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे आणि पॉन्ड्स टॅल्कम पावडरची किंमत 5-7 टक्क्यांनी वाढली आहे.
एचयूएलने गेल्या महिन्यातही किमती वाढवल्या होत्या.
HUL ने गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2022 मध्ये आपल्या उत्पादनांच्या किमतीतही वाढ केली होती आणि 3 टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादनांच्या किमतीत वाढ केली होती. यामध्ये स्किन केअरपासून डिटर्जंटपर्यंतच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी ब्रू कॉफीच्या किमतीत 3-7 टक्क्यांनी आणि ब्रू कॉफीच्या जारच्या किमतीत 3-4 टक्क्यांनी वाढ झाली होती. याशिवाय ताजमहाल चहाच्या किमतीत ३.७ ते ५.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.