⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

रेल्वेत स्लीपर क्लासने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस आपल्या सोयी आणि वेगामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. अशा परिस्थितीत या ट्रेनला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता भारतीय रेल्वे रुळांवर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चालवण्याचा विचार करत आहे.

अपग्रेडेशनसाठी निविदाही काढण्यात आल्या
भारतीय रेल्वेने 200 स्लीपर वंदे भारत एक्सप्रेससाठी निविदा जारी केल्या आहेत. या निविदेत एक्स्प्रेसचे डिझाइन, निर्मिती आणि देखभाल यांचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनसाठी रेल्वेने निविदाही काढल्या आहेत. निविदेची अंतिम तारीख रेल्वेने २६ जुलै २०२२ ही निश्चित केली आहे.

ट्रेनचे सर्व डबे वातानुकूलित असतील
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व डबे वातानुकूलित असतील. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्यम आणि लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहे. रेल्वेच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदेबाबत असे सांगण्यात आले की, सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर किंवा चेन्नई येथे असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये केले जाईल.

200 गाड्या निर्धारित वेळेत तयार होतील
रेल्वेने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 20 मे 2022 रोजी पहिली प्री-बिड परिषद होणार आहे. रेल्वेने निविदेत सांगितले की, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसच्या डिलिव्हरीची अंतिम मुदत 6 वर्षे 10 महिने असेल. कंपनी या कालावधीत 200 ट्रेन तयार करेल.

16 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 1 फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 11 थर्ड एसी कोच असतील. 20 कोच असलेल्या स्लीपर ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 15 थर्ड एसी कोच बसवण्यात येणार आहेत. या ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास असेल.