⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

BHR प्रकरणात एसआयटीकडून तपासाला सुरुवात, तक्रारीच्या कागदपत्रांची तपासणी, जाबजबाबला सुरुवात!

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (BHR) प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे मद्यव्यापारी उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पुण्यात दाखल या गुन्ह्याचे ठिकाण चाळीगाव असल्याने गुन्हा जळगाव जिल्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी गठीत केलेल्या एसआयटी पथकाने चाळीसगावी येवून तपासाला सुरुवात केली आहे. पथकाकडून जाबजबाब नोंदविले जात असून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

गुन्ह्यातील संशयित उदय पवार फरार आहेत. याच्या शोधार्थ एसआयटीचे पथक चाळीसगावात देखील जाऊन आले. एसआयटी पथाकाने घटनास्थळ पाहणी, पंचनामे आणि तांत्रिक माहितीचे संकलन करण्यात आले. या पथकातील निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पोलीस मुख्यालयातील एसआयटीच्या कार्यालयात या गुन्ह्याचे मूळ फिर्यादी सूरज झंवर यांच्यासह इतर साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्यात आले. सुनील झंवर यांच्याकडून काही पुराव्यासह दस्तऐवज एसआयटीने ताब्यात घेतले असून त्याची देखील पडताळणी केली जात आहे.

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार केले आहे. विशेष तपास पथकात पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हेडकॉन्टेबल विजय पाटील, नरेंद्र वारुळे, नाईक जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे. गुन्ह्याची व्याप्ती आणि संशयीत हे प्रतिष्ठित असल्याने एसआयटीची आवश्यकता होती. तक्रारदार यांनी देखील तशी विनंती केली होती. इतर प्रभारी अधिकाऱ्यांकडे इतर देखील गुन्ह्यांचा तपास असल्याने या गुन्ह्याच्या तपासला योग्य गती मिळाली नसती त्यामुळेच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

गेल्या सहा दिवसात एसआयटीकडून करण्यात आलेल्या तपासाची गती लक्षात घेता लवकरात लवकर सर्व तपास पूर्ण होईल अशी शक्यता आहे. एसआयटी प्रमुख निरीक्षक संदीप पाटील यांनी अगोदर सायबर शाखा आणि गुन्हे शोध पथकात काम केलेले असल्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.