जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२५ । सध्या जळगावात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे जळगावकर होरपळून निघत आहे. यातच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने वाहनधारकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत सिग्नल बंद ठेवले जाणार आहे. शहरातील सात चौकांमधील हे सिग्नल यलो ब्लिंकर मौडवर राहणार आहेत.

खरंतर जळगावमध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तापमान ४२ अंशाच्या पुढे गेल्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. दुपारनंतर घराबाहेर पडणेही मुशकील झाले आहे. अशा स्थितीत महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या वाहनचालकांना ट्रॅफिक सिग्नलवर थांबावे लागते. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील सात ट्रॅफिक सिग्नल यलो ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय घेतला, तसे पत्र वाहतूक शाखेने महापालिकेला दिले आहे. त्यानुसार हे सिंग्नल दुपारी १२ ते ५:३० वाजेदरम्यान सिंग्नल ब्लिंकर मोडवर राहणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी चौकातून जाताना वेगाचेही पालन करत वाहतूक सिंग्नल पार करताना वाहनचालकांना थांबून, दोन्ही बाजूंना पाहून पढे जावे लागणार आहे.
या चौकातील सिग्नल राहतील यलो ब्लिंकर मोडवर
उन्हामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौक, शिवकॉलनी चौक, कालिका माता चौकातील सिग्नल बंद ठेवून ते येलो ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.