जळगाव लाईव्ह न्यूज : १० मार्च २०२३ : उन्हाळ्याची चाहुल लागताच अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. बोदवड तालुक्यात काही गावांना महिन्यातून केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वरणगाव शहरातही पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नळाला पाणी नसल्याने वरणगावकरांना शहरातील हातपंपांचा मोठा दिलासा असतो. मात्र प्रतिभा नगरातील हातपंप वर्षभरापासून बंदावस्थेत आहे. पाठपुरावा करुनही हा हातपंप दुरुस्त होत नसल्याने संतप्त नागरिकांनी बंदावस्थेतील या हातपंपाचे वर्षश्राध्द घालून पालिका प्रशासनाचा निषेध केला.
प्रतिभा नगरात उर्दू हायस्कूल जवळ पालिकेने एक हातपंप बसवला आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून हा हातपंप नादुरुस्त असल्याने रहिवाशांना याचा काहीच फायदा होत नाही. वरणगावला आतापासून पाणी टंचाई जाणवत असल्याने हा हातपंप दुरुस्त करण्याची मागणी रहिवाशांकडून सातत्याने होत आहे. मात्र त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याने रहिवाशांनी अनोख्या पध्दतीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रहिवाशांनी बंदावस्थेतील हातपंपाचे पूजन करुन वर्षश्राध्द घातले. हा हातपंप तातडीने दुरुस्त न खेल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संतोष इंगळे, भैय्या सोनवणे, किशोर कोळी, गयाबाई कोळी, बाळू सोनवणे, पुष्पा वाघ, आरती वाघ, शोभा कोळी, वेदांत वाघ, विजय वाघ आदि उपस्थित होते. या आंदोलनाची दखल घेत शहरातील नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन मुख्याधिकारी समीर शेख यांनी दिले आहे.