जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्या मुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे हि बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे.
हि बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषिमंत्री शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहुन केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्या व येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे हि मागणी केली आहे.
पत्रात त्यांनी खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बांधव पेरणीपूर्व शेतीमशागतीच्या कामाला लागले. आहेत. परंतु गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनही उत्पादनात घट आल्याने आणि शेत मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खते खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणाने शेतकऱ्यांचे या खरीप हंगामाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून जाण्याची शक्यता आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत.
तरी आपणकेंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खतांची ही दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे तसेच खरीप हंगाम सुरु होण्यावर आला असून शेतकऱ्यांकडे योग्य प्रतीचे बियाणे उपलब्ध नसतात. शेतकरी दरवर्षी पेरणीच्या वेळी बाजारातून बियाणे खरेदी करतो. या बियाण्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच यातील काही बियाण्यांचा दर्जा निकृष्ठ असतो.
त्यांची उगवण क्षमता कमी असते. या निकृष्ठ दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागते. त्यामुळे शेतकरी बांधव अजून आर्थिक गर्तेत अडकतो. तरी आपण आपल्या स्तरावरून उचित कार्यवाहीकरून, उच्च प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे योग्य किमतीत शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे व खत व बियाण्यांच्या विक्रीत, किमतीत ,पुरवठ्यात काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी रोहिणी खडसे खेवलकर यांनी केली आहे.