शॉटसर्किटने घर पेटले : दोन लाखांचे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । सावदा शहरातील भोईवाडा येथील एका घराला बुधवारी सकाळी अचानक शॉटसर्किटमुळे आग लागली असता येथील रहिवाशांची धावपळ उडाली. या आगीत घरातील अत्यावश्यक सामानासह रोकड जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांवर नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी शरद पाटील व सहकार्यांनी केला आहे.
सविस्तर असे की, भोईवाडा भागातील रहिवासी किशोर रामा राणे यांच्या राहत्या घराला बुधवार, 10 रोजी पहाटे सहा वाजेदरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली व ती घरभर पसरली. कुणाला काही समजण्याच्या आत आग पसरल्याने यात घरातील वस्तूंसह घरात कामानिमित्ताने आणलेली रोख रक्कम जळून खाक झाले. कुटुंब तत्काळ घराबाहेर पडल्याने अनर्थ टळला मात्र या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनास्थळी सावदा नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
या आगीचा पंचनामा तलाठी शरद पाटील व सहकार्यांनी केला. यात घरातील वाशिंग मशीन, कपडेलत्ते, इलेक्ट्रिक सामान, पंखा, इलेक्ट्रिक फिटिंग सामान, गोदरेज कपात, इतर सामान यासह सुमारे पन्नास हजारांची रोख रक्कम जळून खाक झाल्याचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, या कुटुंबास शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.