जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज हजाराहून अधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन लाॅकडाऊन लागू करीत असून मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. असे असतानाही लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी कुसुंबा नाका येथे उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर) यास अटक केली आहे.
याबाबत असे की, कुसुंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे महाराष्ट्र गादी भांडार येथे या मास्कपासून गादी बनविण्यात येत असल्याची माहिती कुसूंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्वर डापकर, शांताराम पाटील यांनी महाराष्ट्र गादी भांडार गाठले. याठिकाणी पाहणी केली असता, मिळालेल्या माहितीनुसार गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मास्क पडलेले दिसून आले. याबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी यास विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.
मालक अमजद मन्सुरी यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सिध्देश्वर डापकर यांनीच सरकारकडून फिर्याद दिली. तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत