धक्कादायक : ५ हजारांसाठी रिक्षात आवळला एकाचा गळा, मृतदेह कन्नड घाटात फेकला
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । अवघे पाच हजार रूपये परत देण्याच्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह दरीत फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी औरंगाबादच्या दोघांना अटक केली आहे. मधुकर रामदास बुटाले (वय ४५, रा. न्यायनगर, पुंडलिक नगर, औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, २९ ऑगस्ट रोजी कन्नड घाटातील खोल दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताचा चेहरा कुजलेला असल्याने ओळख पटत नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक हर्षा जाधव यांनी मृताच्या चेहऱ्याचा फोटो काढून तो फोटोग्राफरकडून डेव्हलप करुन चेहरा थोडा स्पष्ट करून घेतला. त्यानंतर मृताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटवली. याच पुराव्याच्या आधारे चाळीसगाव पोलिसांनी ३० सप्टेंबरला मृताचा मेहुणा गोपाल शंकर पंडीत (वय ३२) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले (वय २५, दोन्ही रा. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत समोर आले की, मयताचे नातेवाईक घात-पात असल्याचा संशय व्यक्त करत होते. मयताच्या मारेकरीचा कोणताही मागमूस नसतांनाही चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली व गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने दिनांक ३० रोजी सदर मयताचे मारेकरी शोधून त्यांना ताब्यात घेतले. सदर मयताचे मारेकरी हे मयताचा मेहूणा संशयित आरोपी गोपाल शंकर पंडीत (वय-३२) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले )वय- २५, दोन्ही रा. औरंगाबाद) हे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
या दोघांना पोलीसांनी चौकशीसाठी बोलविले. सुरवातील गोपाल पंडीत याने मयताची मुलगी धुळे येथे दिलेली असल्याने कदाचित तो औरंगाबाद येथून धुळे येथे जाण्यासाठी निघाला असावा व कन्नड घाटात उतरून दारुच्या नशेत घाटात पडला असावा, अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.
रिक्षातच गळा दाबून केला खून ; कन्नड घाटात फेकला होता मृतदेह
दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी वरील दोन्ही संशयित आरोपी हे मयतासोबत औरंगाबाद रामगिरी हॉटेल येथून गोपाल पंडीत याची रिक्षा (क्र. एमएच 20 ईएफ-7984) हिचेत बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असतांना ५ हजार रुपये देण्याच्या वादावरुन कृष्णा भोसले व मयत मधूकर बुटाले यांचे चिखलठाणा पोस्टे हद्दीत वरुड गावाजवळ रिक्षातच भाडण झाले. यानंतर कृष्णा भोसले याने मयत मधूकर बुटाले याचा गळा दाबून खून केला व तो मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून त्याचे प्रेत रिक्षाने औरंगाबाद येथून कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्टजवळ दरीत फेकून दिले. सध्या दोन्ही आरोपी हे चाळीसगाव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असून त्यांचेविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केला गुन्ह्याची उकल
सदर गुन्ह्याचा तपास जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय टेंगे, सहा. पोलीस निरीक्षक हर्षा जाधव, पोहेकॉ युवराज नाईक, पोना . शांताराम पवार, सफौ राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ नितीन सोनवणे, पोना शंकर जंजाळे, पोना संदिप माने, पोना मनोज पाटील, पोना प्रेमसिंग राठोड, चालक सफी / अनिल आगोणे अशांनी यांनी केला आहे