जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी 95 हजारांची रोकड लंपास केली तर नऊ लाखांच्या नकली नोटा दिल्याची धक्कादायक घटना भुसावळातील रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक संशयीत सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मंगेश वाडेकर रा.कल्याण यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. वाडेकर यांनी फेसबुकवर कर्जाबाबतची जाहिरात पाहिल्यानंतर संबंधितांनी त्यांच्याशी दोन महिन्यांपासून संपर्क साधला होता. दहा लाखांचे कर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये कमिशन लागेल, असे सांगून संशयीतांनी वाडेकर यांना भुसावळात बोलावले होते. ठरल्यानुसार कल्याण वेस्ट येथील साई शरमन वाडेकर रोडवरील रहिवासी मंगेश गुलाबराव वाडेकर हे मुलासह कर्जाची रक्कम घेण्यास भुसावळातील रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मंगळवार, दि.30 ऑगस्ट रोजी बलेनो कारद्वारे आले होते.
यावेळी संशयीत विकास म्हात्रे याने केवळ पाच हजारांच्या खर्या नोटा बॅगेत टाकून चिल्ड्रन बँकेच्या 500 दराच्या एकूण 1800 बनावट नोटा बॅगेत टाकून शिवाजी पुतळ्याजवळ वाडेकर यांना देत पळ काढला. भुसावळ येथून नोटांची बॅग घेऊन सायंकाळी पाचला निघालेले वाडेकर हे सायंकाळी सात वाजता पारोळा येथे पोहोचले मात्र त्यांनी बँकेत नोटा भरणा करण्यासाठी दिल्या असता त्या चिल्ड्रन बँकेच्या असल्याचे समोर आले. यावेळी पारोळा पोलिसांना पाचारण करण्यात आले.
घडला प्रकार वाडेकर यांनी कथन केल्यानंतर त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसात पाठवल्यानंतर संशयीत विकास म्हात्रे व राजेश पाटील यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये करीत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्हीत चिल्ड्रन बँकेच्या नोटा देणारा संशयीत कैद झाला असून दुसर्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.