धक्कादायक : भुसावळात जलकुंभावरून पडल्याने मजुराचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । अमृत योजनेतून जलकुंभाची उभारणी काम सुरू असतानाच अचानक सुमारे 50 फूट उंचावरून मजूर पडून मजूर मयत झाल्याची घटना भुसावळातील गडकरी नगर भागात १५ रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली.विकास बळीराम पाटील (45,कुर्हेपानाचे,ता.भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.दरम्यान,जलकुंभाची उभारणी करताना ठेकेदाराने सुरक्षा नियमांना तिलांजली दिल्याचा आरोप होत आहे.
तोल जावून पडल्याने मजुराचा मृत्यू
गडकरी नगरातील जलकुंभाच्या उभारणीसाठी शहरातील गडकरी नगरात काम सुरू असून या कामावर कुर्हेपानाचे येथील विकास पाटील हा मजूर काम करीत असताना त्याचा सुमारे 50 फूट उंचावरून पडल्याने बुधवारी मृत्यू झाला. तत्पूर्वी शहरातील खाजगी रुग्णालयात हलवल्यानंतर त्यास रीदम रुग्णालयात हलवण्यात आले मात्र, दुपारच्या सुमारास या मजुराची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात डॉ.नितीन पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मजय मजुराच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.
ठेकेदारावर कारवाईची मागणी
शहरातील अमृत योजनेच्या जलकुंभाची उभारणी करताना सेप्टीच्या (सुरक्षिततेच्या) दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.काम करणार्या मजुरांना हेल्मेट तसेच उंचावर काम करताना सेप्टी बेल्ट आदी सुरक्षात्मक साधने पुरवणे गरजेचे असताना या उपाययोजनांना तिलांजली देण्यात आल्याने अपघात घडत असल्याचा आरोप आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर बाबीची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.