जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड, पिंपळगाव, नांदगाव, येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असेलेला जिजामातांचा वाडा 350 वर्षापूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्याठिकाणीही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार आहे, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.