⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट जाणार सुप्रीम कोर्टात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षनुसार कोर्टात रंगणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधा एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.

शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील 16 आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी शिवसेना विधीमंडळ नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बैठक झाली. ही बैठक जवळपास चार तास सुरू होती. बंडखोर आमदारांना नोटीसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात येतील. त्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात येईल, तसेच बंडखोर आमदारांना दोन दिवसांचा वेळ दिला जाईल. दोन दिवसात आमदार आपले उत्तर दाखल केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोण आहेत 16 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
13) सदा सरवणकर
14) प्रकाश आबिटकर
15) संजय रायमूलकर
16) रमेश बोरनारे