…तर शिवसेनेचे 56 आमदार आज भाजपसोबत असते ; गुलाबराव पाटलांची टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट कमी झाले आहे. असेच संकट कमी होऊ दे, असे आपण श्री विठ्ठल – रुक्मिणी चरणी साकडं मंत्री पाटील यांनी घातलं आहे. दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे 56 आमदार आज भाजपसोबत दिसले असते, असा जोरदार टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
दरम्यान, जळगाव महापालिकेत मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटले होते. या फुटीर नगरसेवकांनी भाजपचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना विजयी केले होते. दरम्यान,आता यातील काही नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी पाटील यांना विचारले असता, भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत आहे. त्यामुळेच हे नगरसेवक आता भाजपकडे जाताना दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली. ही मदत तुटपुंजी असल्याची टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असं ते म्हणाले. राज्य सरकारने जिरायती भागासाठी 10 हजार प्रति हेक्टर व बागायती भागासाठी 15 हजार रुपये प्रतिहेक्टर रुपये मदत जाहीर केली आहे.