जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । शिवसेनेच्या कार्यकाळातील सर्वात मोठे बंद एकनाथ शिंदे यांनी पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांनी ५२ आमदारांसह भाजपशी घरोबा करीत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर सर्व आमदार सहभागी झाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी शनिवारी जळगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांचे नेतृत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याचा आरोप करीत संतप्त शिवसैनिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली.
राज्याच्या राज्यात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाआघाडी सरकार कोसळले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सरकार कोसळल्यानंतर शिवसेना आपल्याला पुन्हा उभारायची असून आपण सर्व कार्यकर्त्यांनी बंडखोरांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या गटात महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्यासह जळगावातील सर्व शिवसेना आमदार सामील झाले होते. गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पालकच बाहेर पडले तर मुले का थांबणार? असा प्रश्न विचारत संजय सावंत यांनी टीका केली होती.
राज्यातील घडामोडीनंतर शनिवारी जळगावात शिवसेनेतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. चित्रा चौकाकडून अजिंठा चौफुली येथे काढण्यात आलेल्या मोर्चात जळगावतील शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली. उद्धव साहेब अंगार है, गुलाबराव भंगार है, तिर्री दुर्री एक्का, गुलाबराव …, निम का पत्ता कडवा है, गुलाबराव … है, गुलाबरावच्या बैलाला रे भो.. अशा घोषणा देत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला. गुलाबराव पाटील यांच्याविषयी जळगावातील शिवसैनिकांच्या तीव्र भावना आजच्या मोर्चात दिसून आल्या.
मोर्चात एकनाथ शिंदे आणि चिमणराव पाटील यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. गुलाबराव पाटील सध्या बिनखात्याचे मंत्री असल्याने काही शिवसैनिक त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. नवीन मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील यांची वर्णी लागल्यास ते पुन्हा मंत्री म्हणून गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यात परतताच आजच्या मोर्चातील अनेक मंडळी गुलाबराव पाटील यांच्यासोबत असतील हे मात्र निश्चित.