---Advertisement---
पर्यटन जळगाव जिल्हा

प्रभु श्रीरामांच्या बाणाने निर्माण झालेला गरम पाण्याचा झरा जळगाव जिल्ह्यात आहे, वाचा काय आहे आख्यायिका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 29 मार्च 2023 | जळगाव जिल्ह्याच्या भुमीला प्रचंड प्राचीन इतीहास आहे. अगदी पूर्व-पुराश्म युगापर्यंत! जिल्ह्यातील मानेगाव व पाटणे येथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांमुळे सुमारे एक ते दीड लाख वर्षांपूर्वी येथे मानव होता, असे दिसून येते. सध्याच्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागाचा उल्लेख थेट रामायण व महाभारतातही करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्याची भुमी प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्षाने पावन झालेली आहे, असे म्हटले जाते. हा संबंध जोडला जातो तो जळगावपासून अवघ्या ३८ किलोमीटर अंतरावर असलेल्या उनपदेव या प्राचीनस्थळाशी!

shir ram and story of unapdev jalgaon jpg webp

सातपुडा पर्वत माथाच्या पायथ्याशी असलेले उनपदेव हे गरम पाण्याच्या झर्‍यामुळे प्रसिध्द आहे. हे स्थान त्रंबकेश्‍वर खालोखाल पवित्र मानले जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत असते. परिसरात मुरलीधर (कृष्ण-बलराम), राम-सीता-लक्ष्मण, हनुमान, महादेव, गणपती आणि शनी या देवतांची मंदिरे आहेत. उत्तरेस टेकडीवर गोविंद महाराजांची समाधी आहे.
मंदिराच्या खालच्या बाजूला भरीव दगडास लागून असलेल्या गोमुखातून साडेसात मीटर लांब व पावणेदोन मीटर उंचीच्या मोठ्या तांबड्या विटांमध्ये बांधलेल्या हौदात गरम पाणी पडते. गोमुखातून पडणार्‍या पाण्याचे तापमान सुमारे ६० अंश सेल्सिअस असते. या पाण्याला चव नसून, त्यास विशिष्ट वास येतो. हा वास गंधकाचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पाण्यात अंघोळ केल्यास आजार बरे होतात, असा समज आहे.

---Advertisement---

शरभंग ऋषींची गुंफा

गरम पाण्याचा झरा असलेल्या हौदाच्या पश्चिम बाजूच्या लगतच जमिनीत शरभंग ऋषींची गुंफा आहे. या गुंफेत महादेवाचे पिंड आहे. दगडात कोरण्यात आलेल्या या गुंफेत आत गेल्यावर मात्र नितांत शांतता आणि गारवा जाणवतो. या गुंफेतून एका वेळेस फक्त एकच व्यक्ती आत किंवा बाहेर जाऊ शकते. येथे राहणार्‍या शरभंग ऋषींच्या उपचारासाठी प्रभु श्रीरामांनी बाणाने उष्णोदकाचा झरा निर्माण केला अशी आख्यायिका आहे.

उनपदेवच्या परिसरात पूर्वी गाव असल्याचे म्हटले जाते. या परिसरात आजही काही ठिकाणी गावाचे अवशेष आढळतात; परंतु सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचे स्थलांतर झाले की पुनर्वसन याबाबत कुठलीही माहिती नाही. परिसरात रामाचे वास्तव्य होते आणि शबरीने रामाला उष्टी बोरं खायला दिल्याची दंतकथादेखील याच ठिकाणची असल्याचे सांगितले जाते. पूर्वी बिहारमधील चंपारण्यातील शरभृंग संप्रदायाचे गोसावी मार्गशीर्ष महिन्यात उनपदेवहून पुढे उन्हकदेवला जात असत. उनपदेव येथे पौष महिन्यात यात्रोत्सव होत असतो. त्यामुळे अनेक भाविकांची यात्रोत्सोवात गर्दी होते.

उनपदेवनंतर सातपुडा पर्वत रांगेतले इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनपदेव आणि निझारदेव. उन्हाळा, पावसाळा किंवा कडाक्याची थंडी कोणताही ऋतू असला तरी येथील पाण्याची पातळी कायम एक समान असते. तसेच पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही. निसर्गाची नवलाई अनुभवयाची असेल तर पर्यटनाचा एक वेगळा पैलू या गरम पाण्याच्या झर्‍यांना प्रत्यक्षात पाहिल्यावर समजतो.

कसे पोहचाल?

येथून सर्वात जवळचे विमानतळ जळगाव येथे आहे. तेथून अवघ्या ३८ ते ४० किलोमीटर अंतरावर गाडीने जाता येते. जवळचे रेल्वेस्थानक देखील जळगावच आहे. ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नसेल ते बसने उनपदेवला पोहचू शकतात. जळगाव येथून चोपडा येथे जाणार्‍या बसेसमधून उनपदेवला पोहचता येते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---