⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचं मोठं पाऊल

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाबाबत शिंदे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शिंदे सरकारने नवी मुंबई विमानतळासह औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती दिली आहे. हे तिन्ही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरु ठेवलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात असल्यानं आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतल्यानं आक्षेप घेतला होता. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविरोधात आक्षेप घेतला होता. हे तिन्ही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.