जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होते. मात्र, अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर हे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागले होते. त्यांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन केलं आहे. मात्र हे सरकार लवकरच कोसळेल असे भाकीत विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठा दावा केला आहे.
जोपर्यंत शिंदे सरकारच्यापाठी 145 आमदारांचं पाठबळ आहे. तोपर्यंत हे सरकार चालेल. आम्ही ठाकरेंच्या (thackeray government) नेतृत्वात सरकारमध्ये आलो होतो, तेव्हा पाच वर्ष काय 25 वर्ष सरकार चालणार असं सांगितलं जात होतं. म्हणायला काय जातं? लोकांना बरं वाटायला, कार्यकर्त्यांना बरं वाटायला, मंत्री, आमदारांना बरं वाटायला असं सांगत असतात. पण सर्वांना माहीत आहे, कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही.
त्यामुळे जोपर्यंत 145 आमदारांचा आकडा त्यांच्या पाठी आहे. तोपर्यंत हे सरकार चालले. ज्यावेळी आमदारांची संख्या कमी होईल, त्या दिवशी हे सरकार गडगडेल, असा दावा अजित पवार (ajit pawar) यांनी केला आहे. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या भवितव्या विषयी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. उद्या 48 पैकी 47 खासदार निवडून आणणार असं भाजपवाले सांगत आहेत. अरे 47 कशाला 48चे 48 निवडून आणणार म्हणा ना. म्हणायला काय जातं? कधीही महाराष्ट्रातील 48 खासदार एका पक्षाचे निवडून आल्याचा इतिहास नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसने 85 पैकी 85 खासदार निवडून आणले होते. हा इतिहास आहे. पण महाराष्ट्रात तसा इतिहास नाही. पण कुणी कितीही वक्तव्य केली तरी महाराष्ट्रातील मतदार विचारी आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो. त्यामुळे राज्यात जे काही मधल्या काळात घडलं ते लोकांना आवडलं नाही. ते निवडणूक झाल्यावर ते दिसेलच, असं अजित पवार म्हणाले.