⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | विशेष | ऑगस्टमध्ये शिंदे, फडणवीस व अजितदादा तर सप्टेंबरमध्ये शरद पवार, उध्दव ठाकरे जळगावात

ऑगस्टमध्ये शिंदे, फडणवीस व अजितदादा तर सप्टेंबरमध्ये शरद पवार, उध्दव ठाकरे जळगावात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ ऑगस्ट २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार २६ ऑगस्ट रोजी पाचोरा येथे येत असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यांची दौऱ्याची जय्यत तयारी तिन्ही पक्षांकडून सुरु आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे येत्या ४ सप्टेंबरला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येत्या १० सप्टेंबरला जळगावात येत आहेत. यामुळे राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यांनी जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघेल यात शंका नाही.

राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी २६ ऑगस्टला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पाचोरा येथे येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी गेल्या आठवड्यातच पत्रकार परिषदेत दिली होती. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविला जात असून, त्याला मिळणारा प्रतिसाद व शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारा लाभ विचारात घेऊन तालुकास्तरावरही हा उपक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांसाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम येत्या २६ ऑगस्टला पाचोरा येथे होत आहे.

एम. एम. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. तालुकास्तरावरील हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी करण्याचा व राज्यभरात तालुकास्तरावरील कार्यक्रम आदर्श पॅटर्न ठरेल, या दृष्टिकोनातून तयारीला गती देण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील जनतेने यासाठी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते एकत्रित पहिल्यांदाच पाचोरा येथे येत असल्याने कार्यक्रमात राजकीय फटकेबाजी होईल, यात शंका नाही.

शरद पवार, उद्धव ठाकरे सप्टेंबरमध्ये जळगावात जाहीर सभा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनंतर शरद पवार प्रथमच जळगावात येत आहेत. त्यांची सागर पार्क मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. तर, उध्दव ठाकरे यांच्या हस्ते १० सप्टेंबरला पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी नुकतीच मुंबई येथे श्री. ठाकरे यांची भेट घेतली. जळगावमध्ये ठाकरे यांचीही जाहीर सभा होणार असून, त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थतीचा आढावाही घेतल्याचे भंगाळे यांनी सांगितले. मुबईत झालेल्या या बैठकीला महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.