⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

शिरसाडच्या मेंढपाळाचा पाटचारीत बुडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । यावल तालुक्यातील शिरसाड येथील एका ४० वर्षीय मेंढपाळाचा पाटचारीत पाय घसरून पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली मेंढपाळ हा बुधवारी पाटचारीत बुडाला होता. विनोद यशवंत धनगर असे मृताचे नाव आहे.

विनोद यशवंत धनगर बुधवारी सकाळी मेंढ्या चारण्यासाठी शिरसाड शिवारातील पाटचारी भागात गेला होता. सायंकाळी पाटचारीजवळ मेंढी जात असल्याने तिला रोखण्याच्या बेतात त्याचा पाय घसरला व तो पाटचारीच्या पाण्यात बुडाल्याने बेपत्ता झाला. त्याच्या मेंढ्या गावातील गोलू धनगर, कैलास धनगर, कुंदन धनगर यांनी त्यांच्या घरी पोहोचवून त्याच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली. कुटुंबाकडून पाटचारी परिसरात सर्वत्र त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळाला नाही.

शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह शिरसाड शिवारातील पाटचारीत मिळाला. पोलिसांना तत्काळ माहिती दिली. यानंतर पाटचारीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत यावल पोलिसात जितेंद्र पांडुरंग धनगर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार संजय देवरे करत आहे. मृत विनोद धनगर याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.