‘तिने’ ‘त्याच्या’शी केले लग्न आणि दुसऱ्याच दिवशी झाली पसार
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । लग्न लावून आपल्या घरात आणलेली नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातील रोकड व दागिन्यांसह पसार झाली. यामुळे वर पक्षाच्या लोकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी नववधूसह चौघांना ताब्यात घेतले आहे.
विवाह होत नसल्याने २७ वर्षीय युवकाने आपल्या परिचयातील पळसपुर (ता. शिरपूर) येथील व्यक्तीशी संपर्क करून लग्न जोडण्यासाठी सुरेश (रा. सेंधवा) यांच्याशी बोलणे केले. दलालांमार्फत मध्यस्थी झाल्यानंतर वधूस एक लाख 60 हजार रुपये, दागिने व साडी असा ऐवज देऊन तिचा चेतनसोबत विवाह उरकण्यात आला. परंतु विवाह करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरातील कपाटातील २५ हजार रुपये रोख व दागिने घेऊन नववधू रात्रीच पसार झाली.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवून सुरेश आर्य (रा. सोनवळ सेंधवा), अनील धास्त (रा. मोहमांडळी- खरगोन), हाकसिंग पावरा (रा.हेद्रयापाडा- शिरपूर) व कलीता उर्फ लक्ष्मी किराडा (रा. मोहमांडळी -खरगोन) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्रसिंग पाटील, पंकज सोनवणे व महिला पोलीस योगिता चौधरी करीत आहेत.