⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | शास्त्रीय संगीताला आधुनिकतेची किनार देत ‘शौनक’ने वाढवली जळगावची ‘शान’

शास्त्रीय संगीताला आधुनिकतेची किनार देत ‘शौनक’ने वाढवली जळगावची ‘शान’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याला संगीताचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीत वाचविण्याची धडपड नेहमी सुरुच असते. जळगावातील शौनक नारळे आणि टीमने स्वतः सुरु केलेल्या अंजुमन प्रोडक्शनच्या माध्यमातून शास्त्रीय सांगितला आधुनिकतेचा जोड आपली संगीत संस्कृती जपण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. अंजुमन प्रोडक्शन प्रस्तुत ‘पिया सावन री’ आज युट्युब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. ‘पिया सावन री’च्या निर्मितीमध्ये जळगावच्या शौनक नारळे आणि किन्नरी जोशी यांचा मोठा वाटा आहे.

काळ जसजसा बदलत चालला आहे तसे संगीत देखील बदलले. शास्त्रीय संगीत कालानुरूप पडद्याआड जाऊ लागले आणि त्याची जागा हिपहॉप, रिमिक्स, पॉप संगीत अधिक लोकप्रिय झाले. भारतातील प्रत्येक प्रांत अधोरेखित करणाऱ्या शास्त्रीय संगीताची मजा आणि खराखुरा आनंद कायम टिकून राहण्यासाठी देशभरातील अनेक कलाकार आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. दरवर्षी देशभरात मोठमोठे संगीत महोत्सव आयोजित केले जातात. देशात शास्त्रीय संगीतातील अनेक विशारद आजवर आपण पहिले असून अनेकांना भारताच्या सर्वोच्च सन्मानाने देखील गौरविलेले आहे.

काळानुरूप बदललेल्या संगीताच्या प्रकाराला अनुसरून शास्त्रीय संगीत देखील आधुनिक रूपात सादर करणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील शौनक नारळे हा विद्यार्थी वडील सचिन नारळे यांच्यासोबत घरातच शास्त्रीय संगीत विशारद पंडित भीमसेन जोशी यांचे भैरवी  संगीत ऐकत होता. मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या ठुमरीत तो रमला पण पुण्याच्या शैक्षणिक आणि मेट्रो कल्चरचा प्रभाव असल्याने त्याच्या मनात नवीनच संकल्पना आली. ठुमरी प्रकारातील एक गाणे शौनकने लिहिले आणि वडिलांना दाखवत आपण असा काही वेगळा प्रयोग करू शकतो का? याची विचारणा केली. वडिलांनी होकार देताच ‘पिया सावन री’चा पहिला पाया रचला गेला.

शौनकने ठुमरीचे अनेक प्रकार ऐकून संपूर्ण गाणे लिहिले आणि ते करताना जळगावातील पंडित संजय पत्की यांचे मार्गदर्शन घेतले. ‘पिया सावन री’ला मूर्तरूप देण्याचे कार्य करण्यासाठी शौनकने अंजुमन प्रोडक्शनची सुरुवात केली. त्याच माध्यमातून पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेजमध्ये द्वितीय आणि तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या मित्र मैत्रिणींनी एकत्र येत ‘पिया सावन री’ पूर्ण केले. जळगावातील किन्नरी जोशी यांनी प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहिले. संपूर्ण संगीतबद्ध व्हिडीओ चित्रिकृत करण्यात आला असून त्यात सिनेमॅटोग्राफीचे काम वेदांत कुलकर्णी व सुमित पाटील यांनी पहिले असून गायन मालविका दीक्षित आणि जयदीप वैद्य यांनी केले आहे.

‘पिया सावन री’ संगीतबद्ध करताना त्यात ब्रज भाषा आणि मेळवाडी भाषेची सांगड घालण्यात आली आहे. गुरुवारी ‘पिया सावन री’चे पहिले गाणे युट्युबच्या माध्यमातून रिलीज करून देवी सरस्वतीच्या चरणी अर्पण करण्यात आले. जगण्याला अर्थ असावा पण संगीत सारखा श्वासच नसेल तर त्याला अर्थ नाही म्हणून आपणच आपले शास्त्रीय संगीत जपणे आवश्यक असल्याचे मत शौनक नारळे याने व्यक्त केले. शौनक नारळे आणि टीम अंजुमनकडे सध्या ७ ठुमरी लिहून तयार आहेत. गुरुवारी सकाळी रिलीज करण्यात आलेल्या ‘पिया सावन री’ला अवघ्या काही तासातच रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

गाणे ऐकण्यासाठी क्लीक करा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.