जळगाव लाईव्ह न्यूज | १६ जून २०२३ | शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात या जाहिरातीवरून नाराजीनाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणी शुक्रवारी (१६ जून) जळगावमध्ये पत्रकार परिषदेत खोचक शब्दांत प्रतिक्रिया देताना भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, आमचा समज होता की, हे जे सरकार बनलं आहे त्यात मोठा वाटा किंवा मोठी संख्या भाजपाची आहे. मात्र, जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली की, भाजपाचे योगदान यात जास्त नाही. जास्त योगदान अन्य घटकांचं आहे आणि हे कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहेत, यासंदर्भात शरद पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे. कुणाला कुठही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात अस दिसतय की स्वत: लढायच असत आणि दुसर्या एकदोन टीम तयार करायच्या असतात. पायात पाय घालण्यासाठी याला राजकारणाची बी टीम म्हणतात. ही बी टीम आहे की काय आता कळेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
भाजपा आहे तरी कुठे?
देशभरातील भाजपाच्या निवडणुकीतील यशावर बोलताना शरद पवार म्हणाले, आज केरळमध्ये भाजपा नाही. शेजारी तामिळनाडूतही भाजपा नाही. कर्नाटकमध्ये आत्ता निवडणुका झाल्या, तेथेही भाजपा सत्तेत नाही. तेलंगणा, उडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही भाजपा नाही. मग भाजपा आहे तरी कुठे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्तेत आहे, मात्र तिथं त्यांचं राज्य नव्हतं. तिथं कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. भाजपाने आमदार फोडून मध्य प्रदेशमधील सरकार पाडलं आणि सत्ता ताब्यात घेतली. गोव्यात काँग्रेसचं राज्य होतं, भाजपाने आमदार फोडले आणि सत्ताबदल केला. महाराष्ट्रातही तसचं झालं, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.