जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (दि.५) जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शरद पवारांचे जळगाव शहरात आगमन झालं आहे. दरम्यान, सभेआधीच शरद पवारांचं शहरात भव्य दिव्य स्वागत करत शरद पवार गटातर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शहरात जागोजागी मोठंमोठे बॅनर्स लागले असून वाघ हा वाघ असतो कधीच म्हातारा होत नसतो… असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
सकाळी १०.४५च्या सुमारास शरद पवारांचे शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीवरुन पुष्पवृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी ढोलताशा पथके देखील होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात सभांचा धडका लावला आहे. येवला, बीड नंतर जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी तीन वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे. सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहीत पवार, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह अनेक दिग्गज देते शहरात तळ ठोकून आहेत.
त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सभेच्या जय्यत तयारीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.