जळगाव लाईव्ह न्यूज । अभिनयाचे किंवा कलेचे शिक्षण हे अनुभवातूनच मिळत असते पण अशा काही संस्था आहेत जिथे तुम्हाला कलेचे शास्त्रोक्त धडे दिले जातात, कला सादर करण्याची संधीही मिळते आणि अनुभवही मिळतो. त्यातली भारतातील सर्वोच्च संस्था म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालय म्हणजे ‘एनएसडी’. केंद्र सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या या संस्थेत प्रवेशपरिक्षेद्वारे दरवर्षी प्रत्येक राज्यातून दोन जणांची निवड करण्यात येते. यावर्षी दिल्ली झालेल्या प्रवेश परिक्षेत जळगावातील युवक पवन मनोज इंद्रेकर यांची निवड झाली आहे.
पवन हा शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने वाणिज्य शाखेत पदवी व मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ थिएटर आर्टस् ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. आजवर जळगाव, इंद्रवती नाट्य समिती सिधी (मध्यप्रदेश), कोची (केरळ), गोवा या राज्यातून २५ हून अधिक नाटकातून अभिनय साकारला असून, त्याने इंद्रवती नाट्य समिती सिधीतर्फे केलेल्या एकलव्य (२०१८) या नाटकाची निवड थिएटर ऑलिम्पिक दिल्ली साठी झाली होती. तसेच भारतातील भारंगम (दिल्ली), रंगायतन (विशाखापट्टणम), वसंत नाट्यमहोत्सव (मुंबई) सह बिहारमधील राष्ट्रस्तरावर होणाऱ्या नाट्यमहोत्सवातून सहभाग घेतला आहे.
२३ ते २७ जून २०२४ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या लेखी व प्रात्याक्षिकांचा समावेश असलेल्या प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पवन इंद्रेकर यांची निवड करण्यात आली आहे. पवनच्या निवडीबद्दल त्यांचे जळगावाच्या नाट्य क्षेत्रातील मान्यवरांसह कलावंतांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.