महा आवास अभियान विशेष राज्यस्तरीय पुरस्कारात जळगाव जिल्ह्याचा ठसा
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२३ । महाराष्ट्र शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महा आवास अभियानात जळगाव जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात जळगाव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांना महा आवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतीमानता व गुणवत्ता आणणेसाठी राज्यात ‘महा आवास अभियान-२०२३-२४’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरूवार, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘महा आवास अभियान-२०२१-२२’ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणान्या संस्था व व्यक्ती यांना ‘महा आवास अभियान पुरस्कार’ व ‘महा आवास अभियान विशेष पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
महा आवास अभियान पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात जळगावने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. महा आवास अभियान विशेष पुरस्कारात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये (प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजना) जळगाव जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये घरकुलांचा उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात जळगाव जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजूरी देण्यात जळगाव जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत बहुमजली इमारत बांधण्यात जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. लाभार्थ्यांना जागा करून देण्यासाठी लँड बँक तयार करण्यात जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
किमान १० टक्के घरकुल बांधकामामध्ये फरशी/ लादी, रंगरंगोटी, किचन गार्डन/ परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा साधने व नेट बिलिंग इत्यादीचा वापर करून तयार केलेली घरकुलात जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. अधिकारी – कर्मचारी गटात राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे जळगाव जिल्हा प्रोग्रामर विवेक मनोहर गोहील यांनी द्वितीय, जिल्हा डेटा एंट्री ऑपरेटर गटात सुमित चंद्रकांत बोरसे, तालुकास्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर गटात सतिश मधुकर पवार (पारोळा) यांनी चवथा व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गटात करण चंद्रकांत पाटील (चाळीसगाव) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमामुळे जळगाव जिल्ह्याने महा आवास योजना पुरस्कारात बाजी मारली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात विशेष मेहनत घेतली. त्यांची मेहनत व सकारात्मक पाठपुराव्यामुळे मागील तीन महिन्यांत जिल्ह्यातील ६६० लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.