शाळांची घंटा पुन्हा वाजणार ; ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय झालेला आहे. जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
शाळा सुरू करण्यासाठी जारी करण्यात आलेली जूनी नियमावली
(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.