⁠ 
सोमवार, मे 6, 2024

शिकार केलेल्या गायीच्या मृतदेहाजवळ वाघाची प्रदक्षिणेसह डरकाळी

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शिकार केलेल्या गायीच्या मृतदेहाजवळ बसलेल्या वाघाने गुराख्याला बघताच गुरगुरल्यामुळे गुराख्याची चांगलीच भांबेरी उडाल्याची घटना प्रस्तावित मुक्ताई-भवानी अभयारण्यतर्गत सुकळी जंगलात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

तालुक्यातील मौजे सुकळी येथील गुराखी राहुल इंगळे यांची एक गाय संद्याकाळी घरी परतली नव्हती, दुसऱ्या दिवशी राहुल गुरे-ढोरे घेऊन नेहमीपणे जंगलात गेला असतांना, घटनास्थळी अचानक गुरांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली. नेमका काय प्रकार बघण्यासाठी राहुलने जाऊन बघितले तर समोर पट्टेदार वाघ शिकार केलेल्या गायीच्या मृतदेहाजवळ बसलेला दिसुन आला. अगदी समोरच काही अंतरावर असलेला वाघ गुरगुरायला लागला आणि उठुन गायीच्या मृतदेहाला प्रदक्षिणा घालु लागला. चौहुबाजुंनी गुरे हंबरत असतांना राहुलने जोरजोरात आरोळ्या मारुनदेखिल वाघ घटनास्थळ सोडायला तयार नव्हता.याउलट डरकाळी फोडल्याने गुरे भांबावुन सैरावरा पळाली. या घटनेने राहुल इंगळे यांची पाचावर धारण बसली. संद्याकाळी ‘जळगाव लाईव्ह न्युज’च्या प्रतिनीधी जवळ घटनाक्रम कथन करताना एक प्रकारची अनामिक भीती राहुलच्या चेहऱ्यावर जाणवत होती. तसेच त्यांनी आणखी एका चार दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेबाबत सांगितले. त्या दिवशी जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने गायीचे वासरु वर हल्ला चढवला. मात्र, जबड्यातुन वासरु कसेतरी सुटले व माझ्यादिशेने सुसाट वेगाने पळत आले. मागोमाग बिबटही पळत येतांना बघुन जोरजोरात मारलेल्या आरोळ्यांमुळे बिबट्याने दिशा बदलली. त्या वासराच्या मानेवर बिबट्याचे दात लागले असुन मानेवर सुज आहे.

वरील दोंन्ही घटना याच आठवड्यातील असून वाघांसह बिबट्याचा अधिवास कायमअसून पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. महिनाभरात अंदाजे पाच ते सात गुरांचा पडशा वाघ-बिबट्याकडुन पाडला आहे. काही दिवसांपुर्वी राहुलचा एक गोऱ्हा वाघाच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच आता एका गायीचा बळी वाघाने घेतला. गुरे-ढोरे चारण्याचा पशुपालन करुन उदरनिर्वाह करणे हा वडिलोपार्जित व्यवसाय राहुलचा आहे. अगदी लहानपणापासून सातव्या वर्गातुन शाळेला सोडचिठ्ठी देऊन राहुल गुरा-ढोरांत रमला. वाघाच्या अस्तित्वाची माहीती असुनदेखिल वाघाबाबत मनात भीती नाही.मात्र समोर गुरगुरत एकाकी डरकाळी फोडल्यामुळे काहीशी भीती वाटत असल्याचं राहुल सांगत आहे. गुरें-ढोरे चारुन उदरनिर्वाह करणाऱ्या राहुलचे दोन गुरे वाघाच्या भक्ष्यस्थानी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.याबाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणुन वनविभागाकडे अर्ज सादर करणार आहे. आजपर्यत येथील रानावनात अनेक वाघ मी बघितले. मात्र, आज बघितलेला वाघ व त्याचे रौद्ररुप प्रथमच बघितले.याठिकाणी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे बसवावे व वनविभागानेही हा वाघ एकदातरी टिपौलेल्या छबीतुन बघावा. अशी अपेक्षा राहल ने व्यक्त केली.