⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सावंत साहेब.. जमलं तुम्हाला!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । गेल्या तीन दिवसापासून जळगाव राज्याच्या चर्चेतील विषयात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वादामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर चर्चेत आले आहे. गेल्या तीन दिवसांच्या या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामामध्ये एक पदाधिकारी भाव खाऊन गेला तो म्हणजे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत. एरव्ही शांत वाटणाऱ्या या पठ्ठ्याने गर्दीत दोन बाजू भरभक्कमपणे साधल्या. शिवसेना विरुद्ध शिवसेना व्हाया पोलीस वादात संजय सावंतांनी प्रसिद्धी मिळवली, पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचविले, विरोधकांवर टीका केली आणि विशेष म्हणजे पोलिसांना सन्मानपूर्वक वागणूक देत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली.

राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र उभे राहिल्यापासून दररोज काही ना काही वाद, चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. न्यायालयीन बाब असो किंवा आरोप-प्रत्यारोप, नागरिकांचे मात्र मनोरंजन होत आहे. राज्याने कधी पहिले नसेल अशा थराचे राजकारण सध्या अनुभवायला मिळत आहे. शिवसेनेत सध्या दोन गट झाले असून मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाजूला पडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे.

शिवसेनेतील मुलुख मैदान तोफसह इतर सर्व लहान मोठे वक्ते सध्या शिंदे गटात असून उर्वरित आणि नवनवीन चेहरे उद्धव ठाकरेंची शिवसेना गाजवीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सध्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि युवा सेना विस्तारक शरद कोळी यांच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे. महाप्रबोधन यात्रा घेऊन दोघे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात इतर ठिकाणी सर्व सुरळीत पार पडले मात्र जळगावात जरा गडबड झाली.
हे देखील वाचा : अंधारेंच्या सभेत गुलाबरावांनी मारली बाजी!

धरणगाव आणि पाचोरा येथील सभा गाजवल्यावर शरद कोळी यांना भाषणास बंदी घालण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना गुर्जर समाजाचा अपमान केल्याचे सांगत समाजाकडून निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचा आदेश काढताच पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी हॉटेलवर पोहचले. हॉटेलमध्ये पोलीस येताच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे शरद कोळी आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन पायी चालत पोलीस ठाण्यात पोहचले. काही क्षणात शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली.

गुर्जर समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शरद कोळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांना अटक होण्याची बातमी पसरली. संजय सावंत यांनी सुषमा अंधारे यांना सभेसाठी चोपडा रवाना केले तर स्वतः पोलिसांसोबत चर्चा करीत पोलीस ठाण्यात पोहचले. दुसरीकडे महापौर जयश्री महाजन यांनी शरद कोळींना आपल्या वाहनात बसविले शनिपेठच्या कोपऱ्यापर्यंत सोडत त्या दुसऱ्या वाहनाने परतल्या. संजय सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा आधार घेत पोलिसांना आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवले तोवर शरद कोळी सुखरूप बाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेला परवानगी नाकारल्यावर सभा घेणारच असा पवित्रा सुषमा अंधारे यांनी उचलला होता. पोलिसांच्या कानावर बातमी पडताच पोलीस धडक हॉटेलवर पोहचले. सुषमा अंधारे आणि सर्व पदाधिकारी मुक्ताईनगरच्या दिशेने निघत असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. मुळात पोलिसांकडे सुषमा अंधारे यांना रोखण्याचा किंवा त्यांना भाषण करण्यापासून मज्जाव करणारा कोणताही आदेश नव्हता. संजय सावंत यांना हे सर्व ठाऊक असताना देखील त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. कायद्याचा आधार देत सर्व समजावून सांगितले. पोलिसांच्या विनंतीचा मान ठेवून आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मुक्ताईनगर दौरा रद्द करण्यात आला.
हे देखील वाचा : जळगाव जिल्ह्यात जि.प. , प.स.मध्ये महाविकास आघाडीसाठी शिवसेना उत्सुक, मात्र..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून संजय सावंत गेल्या काही वर्षापासून काम पाहत आहेत. एरव्ही ते कधीही जास्त बोलताना किंवा संताप करताना दिसून आले नाही. संयमी स्वभावाची प्रतिमा त्यांनी कायम ठेवली होती. पोलीस ठाण्यात कडक आवाजात त्यांनी दिलेल्या उत्तरापुढे पोलिसांना देखील नमते घ्यावे लागले. यापूर्वी जनआक्रोश मोर्चात त्यांनी जोरदार आवाज उठवला होता. संजय सावंत यांनी विरोधकांवर अनेकदा टीका केली आहे मात्र ती मर्यादेत राहूनच केली आहे. गेल्या दोन दिवसातील घटना घडामोडी लक्षात घेता सुयोग्य राजकारण कसे करावे हे संजय सावंत यांनी दाखविले.

स्थानिक पोलिसांना केलेले सहकार्य, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शांत ठेवणे, विरोधकांना लक्ष करणे आणि पुढील नियोजन करणे या सर्व बाजूंचा ताळमेळ संजय सावंत यांनी घडवून आणला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिल्ह्यात मोठा वाव देण्यासाठी यापुढे संजय सावंत जातीपुर्वक लक्ष देतील आणि पक्षीय गटतट मिटवून योग्य चेहऱ्यांना पुढे जाण्याची संधी देतील हीच अपेक्षा कार्यकर्ते आणि पदाधिकारी करीत आहेत. सावंत यांना दोन दिवसात जे जमले तेच जर पुढे पक्षासाठी जमवले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा दूध संघ, जळगाव शहर मनपामध्ये सकारात्मक चित्र उभे राहील हे निश्चित.