जळगाव लाईव्ह न्यूज । ८ चा उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचासह शिपायाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. सरपंच तुळशीराम कांबळे आणि शिपाई आत्माराम मेहनकार असं लाचखोरांचे नाव असून असून या कारवाईने गावात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे काकोडा गावातील रहिवासी असून त्यांची गावात बखळ जागा आहे. ती जागा स्वतःच्या नावावर करून शासनाच्या घरकुल योजनेत घर बांधण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी आवश्यक असलेला नमुना क्रमांक ८ चा उतारा मिळवण्यासाठी त्यांनी सरपंच तुळशीराम कांबळे यांना भेट दिली. त्यावेळी सरपंच यांनी उतारा मिळवून देत त्याबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदारांनी ही बाब मनावर न घेता थेट ७ नोव्हेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी सुरू असताना पंचासमक्ष ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. लाच मागणीला सरपंच कांबळे यांनीही प्रोत्साहन दिल्याचा पुरावा मिळाल्यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात सरपंच तुळशीराम कांबळे आणि शिपाई आत्माराम मेहनकार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.









