---Advertisement---
जळगाव जिल्हा

जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा

---Advertisement---

jain 4 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक… पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद… ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह… विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

---Advertisement---

जैन कृषि संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणूकीस सुरवात झाली. श्रद्धाज्योत या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणूकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला. यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू श्री. तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, श्री. राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन याच्याहस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

भूमिपुत्रांचा सत्कार

जैन कृषि संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर 25 च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी 35 च्यावर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला.

‘भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया डॅनियल हदाद यांनी दिली.’ ‘ऋषभराजाला ऊर्जास्वरूपात आजही शेतीमध्ये स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शेतीमध्ये ऋषभराजाला अनन्य साधारण महत्त्व त्याचमुळे प्राप्त झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी ऋषभराजाचे पूजन त्याच्या कष्टाप्रती केलेला सन्मानच ठरतो अशी भावना डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.’ ‘सण-उत्सव वर्षभर येत असतात मात्र बळिराजा आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा बंधूभाव जोपासणारा वाटतो. गत 25 वर्षापासून हा सण जैन हिल्सला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.’

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले शेतकरी बांधव हे त्यांच्या परिवारासह उपस्थितीत होते. या पोळा सणाच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनच्या सर्व विभागातील सर्व सहकारी प्रयत्न केले. या कार्यक्रमात सहकारी हे परिवारासह उपस्थिती होते. यासह अनुभूती निवासी स्कूलमधील 200 हून अधिक विद्यार्थी, गांधी तीर्थ येथे देशभरातून अभ्यासक्रमासाठी आलेले विद्यार्थीही उपस्थितीत होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---