जळगाव शहर

‘सारथी’ करणार स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन नि:शुल्क मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब (अराजपत्रित), सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सारथी संस्थेच्या मुख्यलयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील 4163 चौरसमीटर जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली आहे. तसेच संस्थेस 41 अधिकारी व कर्मचारी मंजूर केले आहेत. त्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

सारथी संस्थेमार्फत एम.फील/पीएच.डी करीता ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण 207 विद्यार्थ्याची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी दरवर्षी अंदाजित पाचशे रिक्त जागा घोषित होतात. त्यासाठी सारथी, पुणेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ‘ब’ (अराजपत्रित) साठी संयुक्त (पूर्व) ब (मुख्य) परीक्षांसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांसाठी 2020-21 मध्ये अंदाजित 20 हजार रिक्त पदे जाहीर झाली. त्यासाठी ‘सारथी’ पुणेतर्फे केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ‘ब’ व गट ‘क’) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित होतात. त्यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील 250 उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) साठी सन 2020 मध्ये 74 रिक्त पदे जाहीर झाली. त्यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण 400 उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. सारथी, पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी 2019-20 मधील MPSC पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण 24 हजार अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार निवड करू शकणार आहेत.

सारथी संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात 948 जणांनी सहभाग नोंदविला होता. मागविलेल्या घोषवाक्यांपैकी संचालक मंडळाने ‘शाहू विचारांना देवू या गती, साधू या सर्वांगीण प्रगती’ या घोषवाक्यची निवड झाली. हे घोषवाक्य जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते. स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फे त्यांना 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button