⁠ 

देशातील मम्मींना तरुण ठेवणारा संतूर साबण जळगाव जिल्ह्यात तयार होतो, हे तुम्हाला माहित आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ जानेवारी २०२३ | एका जाहिरातीत एका सुंदर महिलेला सर्वजण तरुण मुलगी समजतात, नंतर त्या महिलेची मुलगी मम्मी, मम्मी म्हणून धावत येते आणि सर्व जण आश्‍चर्यचकीत होतात… संतूर साबणाची ही लोकप्रिय जाहिरात आपणा सर्वांना माहित आहेच. ‘आपकी त्वचा से आपकी उमर का पता ही नही चलता…’ असा आशय सादर करणार्‍या या संतूर साबणाच्या जाहिरातीने गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांच्या मनावर गारुड केलं आहे. संतूर साबणाची जाहिरात व त्यातील संतूर मम्मी ही सर्वांना परिचित आहे. देशातील मम्मींना तरुण ठेवणारा हा संतूर साबण कुठे तयार होतो, हे तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला सांगितलं की संपूर्ण देशात लोकप्रिय असणारा हा संतूर साबण आपल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तयार होतो, तर तुमचा विश्‍वास बसेल का?

विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचा संतूर साबण सांगितलेल्या ठिकाणी न पोचल्याने अमळनेर पोलिसात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात संतूर साबण व अमळनेर शहरातील विप्रो कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय असलेली विप्रो कंपनी आपणा सर्वांना माहित आहेच. अझीम प्रेमजी हे भारतातील टॉप आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे संस्थापक आहेत. मात्र या कंपनीच्या स्थापनेचा संबंध जळगाव जिल्ह्याशी आहे, हे आपणास माहित आहे का? विप्रो कंपनीमुळे अमळेनर शहरातील अनेक लोक कोट्याधीश झाले असून या गावाचे बाजारमुल्य तब्बल ७ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

विप्रो कंपनीचे सुमारे ७ हजार कोटींचे शेअर्स अमळनेरमध्ये
अजीम प्रेमजी यांचे कुटुंब मूळचे ब्रम्हदेशचे. त्यांचे वडील मोहम्मद हाशिम प्रेमजी यांचा तिथे मोठा तांदळाचा व्यवसाय होता. पुढे ते भारतात आले. भारतात आल्यानंतर मोहम्मद प्रेमजींनी १९४५ मध्ये वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड (विप्रो) नावाची कंपनी स्थापन केली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून विप्रोचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला या कंपनीत वनस्पती तेल ‘डालडा’ आणि कपडे धुण्याचा साबण बनवायचा. पुढच्या काळात ही छोटीशी कंपनी एका मोठ्या साम्राज्यात रुपांतरीत झाली. मोहम्मद प्रेमजी यांनी जेंव्हा कंपनीची स्थापन केली तेव्हा त्यांची कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सुचीबद्ध केली होती. त्यांनी कंपनीतच काम करणार्‍या कामगारांना आणि स्थानिकांना यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार ज्यांनी गुंतवणूक केली. ते आज मालामाल झाले आहे.

त्याकाळी शेअरची किंमत १०० रुपये होती. या गुंतवणुकीमुळे त्या काळातील बहुतांश कर्मचार्‍यांच्या पुढच्या पिढ्या आता करोडपती झाल्या आहेत. एका माहितीनुसार, २.८८ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात विप्रो कंपनीचे तीन टक्के शेअर्स आहेत. सध्याचे मार्केट कॅपिटल पाहता त्यांचे मूल्य सुमारे अंदाजे ७ हजार कोटी रुपये आहे. आपल्या कुटुबियांकडे विप्रोचे कोट्यावधी रुपयांचे शेअर्स असल्याचे दुसर्‍या व तिसर्‍या पिढीलाही माहित नव्हते. एकदा विप्रोच्या वार्षिक अहवालातील भागधारकांच्या यादीत काही नावे ओळखीची असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या मुलांना व नातवाला याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर ते करोडपती झाले. या कंपनीचे एक युनिट अजूनही अमळनेर शहरात सुरु असून तेथे संतूर साबणाचे उत्पादन होते. अमळनेर येथून संतूर साबण संपूर्ण देशात पाठविले जातात.

संतूर हे नाव असे निश्‍चित झाले
चंदन आणि हळदीचा वापर सौदर्यप्रसाधांमध्ये खूप पुर्वीपासून केला जातो. याचे महत्व ओळखून विप्रोने १९८५ मध्ये संतूर साबणाचे उत्पादन सुरु केले. संतूर साबणाचे नाव कसे ठरले, या मागेही मोठे लॉजिक आहे. चंदनाला इंग्रजीत सॅडलवूड तर हळदीला टर्मरिक म्हणतात. या दोन्हीच्या स्पेलिंगमधून पहिले तीन अक्षर निवडून म्हणजे, ‘San’dalwood + ‘Tur’meric = Santoor, संतूर असे नाव निश्‍चित करण्यात आले.

३३ लाख रुपयांचे संतूर साबण चोरीचे काय आहे प्रकरण?

४ जानेवारीला अमळनेर शहरातील विप्रो कंपनीतून दहा टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टमार्फत ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून गाडी भरण्यात आली होती. चालक व मालक यास ५० हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली होती. ९ जानेवारीला ट्रक तुमकूर येथे पोचणे आवश्यक होते. मात्र माल त्या ठिकाणी पोचला नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद येत आहेत. त्यामुळे त्यांनी विश्वासघात करून ट्रकमधील ९८० बॉक्स सुमारे १८ टन १०० किलो वजनाचे सुमारे ३३ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा माल अपहार केल्याचे दिसून येत आहे. लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे तपास करीत आहेत.