जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज २ जानेवारी शेवटची तारीख आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय. जळगाव महापालिकेतील वॉर्ड क्रमांक २ ड मधून शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे
उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर संतोष पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ही जागा महायुतीच्या भाजपमध्ये वाट्याला असल्याने पक्षाने माघार घेण्याचे निर्देश दिले असून, पक्षाचा आदेश मान्य करून आपण निवडणूक अर्ज मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी अर्ज भरताना संतोष पाटील यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळू शकला नाही. त्यानंतर पक्षाकडून माघार घेण्यास सांगण्यात आल्याने आपण उमेदवारी मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संतोष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार किशोर पाटील उपस्थित होते. आमदार किशोर पाटील उपस्थित राहिल्यामुळेच संतोष पाटील यांची उमेदवारी कापली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



