⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

..तर एकनाथ खडसेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे ; संजय पवारांचे आव्हान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ मार्च २०२४ | एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण केले. अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात होत असताना शरद पवार साहेबांनी त्यांना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी दिली. पक्ष वाढला नाही मात्र गटबाजी वाढली. आज खडसे विधानपरिषद सदस्य आहेत. ज्यांनी मतदान केले त्यापैकी २५ सदस्य आज अजित पवारांसोबत आहे. खडसेंमध्ये स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी पुन्हा निवडून यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच बारामती इच्छूक उमेदवार सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याविषयी काही उद्गार काढले होते. त्याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अरविंद मानकरी, सीमा नेहते, रमेश पाटील, योगेश देसले, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.

संजय पवार म्हणाले की, एकनाथराव खडसे जे म्हणाले त्याबद्दल आम्हाला प्रचंड दुखः झाले आहे. खडसे भाजपला कधी झालेच नाही. त्यांनी मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण यांच्यावर वाटेल तसे आरोप केले. त्यांनी देखील त्याच भाषेत उत्तर दिले. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर स्वतःला आमदारकी मिळवली, मुलीला प्रदेशाध्यक्ष केले. तेव्हापासून त्यांनी एक डावपेच आखण्यास सुरुवात केली. रावेरची जागा मीच लढणार म्हणून त्यांनी सर्वांना सांगत आपल्या पदरात पाडून घेतली आणि सुनेच्या भाजप तिकीटाची आखणी केली. आज खडसेंनी मी लढणार नाही असे सांगत ते पळून गेले. पवार साहेबांशी त्यांनी गद्दारी केली, असे पवार म्हणाले.

पुढे संजय पवार म्हणाले की, मी सांगेल तीच पूर्वदिशा मी सांगेल तोच पक्ष अशी खडसेंची भुमिका आहे. ज्या पक्षाने त्यांना ३५ वर्ष मान सन्मान दिला त्यांना ते झाले नाही. पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी स्वतःच्या सुनेची उमेदवारी घेतली. स्वतःसाठी किंवा मुलीसाठी उमेदवारी त्यांनी घेतली नाही. लेवा पाटील समाजाचा ठेकेदार म्हणून खडसेंनी आजवर काम केले आहे. दरवेळी ते लेवा समाजावर अन्याय होतो म्हणून ते सांगतात मात्र गेल्या वेळी हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी कापताना त्यांना ते दिसले नाही. अगोदर खडसेंनी राजीनामा द्यावा आणि मग अजित पवारांवर बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.

संजय पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर बसून मी आजही भाजपमध्ये जाऊ शकतो असे काल खडसे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंनी गट तट निर्माण केले आहेत. भाजपने यांना ३५ वर्ष मंत्री केले तरी त्यांनी पक्ष सोडला. कुटुंब आणि स्वतःला सेट करण्याचे काम एकनाथराव खडसेंनी केले आहे. आपल्याच लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले. मी भाजपत जाणार असे खडसे सांगत आहे. पण भाजपने देखील विचार करावा, पक्षश्रेष्ठींनी बघावे. मान सन्मानाच्या गोष्टी खडसेंनी करू नये, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना मी पक्ष बांधणी करेल असे ते म्हणाले होते मात्र त्यांनी पक्षाचा वापर करून घेतला. कुणाचा, कधी आणि कुठे वापर करायचा हे खडसेंनी साध्य केले आहे. जिल्ह्यात एकनाथराव खडसेंचे काळे कृत्य एकदा तरी जनतेला माहिती व्हायला हवे. खोटे गुन्हे दाखल करायचे, मोक्का लावायचा प्रयत्न करायचा आणि नंतर बिनशर्त मागे घ्यायचे असे धंदे एकनाथराव खडसेंनी केले आहे, असा आरोप संजय पवार यांनी केला आहे.